सांगली/तासगाव : येथील तासगाव अर्बन बँके शेजारी तासगाव आगाराच्या आवारातील वापरात नसलेली खुली जागा महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तसेच गार्डन विकसित करण्यासाठी मिळावी अशी लेखी मागणी पुतळा समितीच्या वतीने आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी तासगाव अर्बन बँकेचे संचालक रामशेठ शेटे, विनय शेटे, अनिल कुत्ते, निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील उपस्थित होते.
तासगाव नगरपालिकेच्या हद्दीतील तासगाव आगारातील रिकामी जागा यापूर्वी स्व. रावबहादूर सदाशिव बाबाजी शेटे यांना झाडे , बाग बगीचा सुशोभीकरणासाठी तत्कालीन मामलेदार यांच्याकडून सनद द्वारा मिळालेली आहे.
तासगाव शहर व तालुक्यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून तासगाव शहरात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा असावा अशी तमाम वीरशैव बांधवांची इच्छा आहे.
लोकसहभागातून महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले असून याचा कोणताही भाग शासनावर पडणार नाही असे पुतळा समितीच्या वतीने सांगण्यात आले.
तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन श्री महेश्वर हिंगमिरे यांनी पुतळा समितीच्या वतीने पुतळा उभारण्यासाठी नाममात्र भाड्याने खुली जागा मिळावी अशा आशयाचे निवेदन नुकतेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांना दिले आहे.यासंदर्भात वीरशैव समाज बांधव , पुतळा समितीे पदाधिकारी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन अजितदादा यांनी दिले असल्याची माहिती आर. डी. पाटील यांनी दिली. यासंदर्भात खासदार विशालदादा पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील व आमदार रोहितदादा पाटील यांना विनंती करण्यात येणार असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रिपोर्ट अतुल काळे