रिपोर्ट - अतुल काळे
सांगली/तासगाव : उमेदवारी अर्ज माघारी घ्या. यावेळी आमच ऐका. पुढच्यावेळी नक्की संधी देतो, माझ्यावर विश्वास ठेवा. असे म्हणत दिग्गजांनी उमेदवारांच्या उंबऱ्याकडे पाय वळवले असून गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवशी उमेदवारांची मनधरणी मिशन तासगाव शहरात राबवले गेल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
तासगाव नगरपरिषद निवडणूक वातावरण रंग धरू लागले आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरण्यास विलंब लावला होता. शेवटच्या तीन दिवसांमध्ये 203 उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. प्रभाग 1 ते 12 मधून पहिला अर्ज कोण भरणार याकडे लक्ष लागून राहिले होते. विरोधक उमेदवार कोण? यावर आपण उमेदवार कोणता द्यायचा याची रस्सीखेच दिसून आली. सोमवार दि. 17 अखेर नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 190 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एकूण 203 उमेदवारी अर्जांमध्ये अपक्ष उमेदवारांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्त्यांनी बंड उभा करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. आपली किंमत नेत्याला आणि पक्षाला कळावी यासाठी उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर भरले गेले.
अर्ज मागे घेण्याची तारीख आणि वेळ जसजशी जवळ येईल तसं तसे मतांचे समीकरण, गणिते तपासण्यास वेग आला. शुक्रवार दि. 21 च्या पूर्वेसंध्येपासून अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे सत्र सुरू झाले. शक्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून तर बऱ्याच ठिकाणी फोनवरून मनधरणी करण्यात आल्याचे समजते. यामध्ये आमदार रोहित पाटील तसेच माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आपापल्या नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोराचे प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नगरपरिषद तासगाव परिसरात सर्वच राजकीय पक्षाच्या, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
नगराध्यक्ष उमेदवाराच्या माघारीची चर्चा
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सीमा महादेव पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या पत्नी सीमा पाटील यांनी नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा चंग बांधला होता. परंतु दि. 21 रोजी दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महादेव पाटील यांच्या भूमिकेबद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत.
