पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान साजराकेला जातो. त्या निमित्त यावर्षी वायंगणी (ता. मालवण) येथे पक्षी निरीक्षण व पक्षीगणना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि वन्यजीव अभ्यासक स्वप्नील गोसावी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
वायंगणी हे मालवण तालुक्यातील जैवविविधतेने परिपूर्ण असे गाव. आकाराने लहान असूनही इथे घनदाट जंगल, पाणथळ जागा, विस्तीर्ण सडे आणि समुद्रकिनारा असे विविध अधिवास आढळतात. अधिवासानुसार प्रजातींचा बदल जाणवत असल्यामुळे हे गाव पक्षी निरीक्षणासाठी आदर्श स्थळ आहे.
या वर्षी आयोजित गणनेत सकाळी आणि संध्याकाळी मिळून 100 पेक्षा अधिक पक्षीप्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये शिंजिर, फुलटोचा, हळद्या, काळटोप हळद्या, टकाचोर, छोटा सोनपाठी सुतार, शमा, कोतवाल, तांबट, व्याध, कुटूरगा, पिचू पोपट, छोटा खंड्या, बलाकचोच खंड्या यांसारखे स्थानिक पक्षी आढळून आले. तसेच दलदली भोवत्या, लहान खरूची, हिरवा वटवट्या, सामान्य गप्पीदास यांसारखे स्थलांतरित पाहुणेही दिसून आले.
यंदाच्या भरपूर पावसामुळे वायंगणीतील पाणथळ जागा अजूनही पाण्याने समृद्ध आहेत. त्यामुळे लहान व मोठे बगळे, राखी बगळा, छोटा व भारतीय पाणकावळा, तिरंदाज, टिबुकली, कुवा अशा जलपक्ष्यांचीही मोठ्या संख्येने नोंद झाली.
या सर्वांमध्ये सर्वाधिक महत्वाची नोंद म्हणजे गेल्यावर्षी प्रमाणेच संकटग्रस्त प्रजाती असलेला राखी डोक्याचा बुलबुल या वर्षीसुद्धा वायंगणी गावात दिसून आला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वचितच दिसणारा लहान खरूची हा पक्षी सुद्धा वायंगणी गावात आढळून आला.
*ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग*
या वर्षीच्या पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ज्ञानदीप हायस्कूल, वायंगणी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक टकले सर आणि शिक्षक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी जोराची थंडी असूनही भल्या सकाळी हजेरी लावली. त्यांच्यासोबत शाळेचे शिक्षक केतकी बांवकर मॅडम व वसावे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दुर्बीण आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने पक्षीनिरीक्षण केले आणि स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांविषयी सखोल माहिती जाणून घेतली. मुलांचा उत्साह पाहून वायंगणीतील निसर्गाची जबाबदारी पुढील पिढीही तितक्याच विश्वासाने जपेल याचा विश्वास अधिक दृढ होतो.
