( रिपोर्ट अतुल काळे )
सांगली /तासगाव : दसऱ्यानिमित्त तासगाव तालुक्यातील कवठे एकंद आणि नागाव कवठे येथे होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागाकडून नुकतीच घेतली गेलेली सुरक्षा बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
रविवारी कवठे एकंद येथे झालेल्या शोभेच्या दारूच्या स्फोटामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर तासगाव तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. स्पोटानंतर त्याची कारणे, ठिकाण, असुरक्षिततेचा अभाव, परवानाग्या याबाबत तपासणीला उधाण आले. यासोबतच दोन्ही गावातील ग्रामस्थांची कार्यकर्त्यांची तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठमोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या. परंतु हीच बैठक दोन महिन्यापूर्वी घेतली गेली असती तर कदाचित रविवारी झालेला अनर्थ टळला असता.
दसऱ्या निमित्त तासगाव तालुक्यातील कवठेएकंद आणि नागाव कवठे या गावांमध्ये फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येते. या आतषबाजीला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सध्या होणारी अतिषबाजी ही पूर्वी काळाच्या आतषबाजी पेक्षा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामस्थांकडून विविध प्रकारचे नाविन्यपूर्वक शोध लावून शोभेची दारू उडविली जाते. ही शोभेची दारू बनविण्याचे आणि विविध प्रकार आणण्याचे काम दसऱ्याच्या कित्येक महिने आधी सुरू असते.
ज्या प्रमाणात शोभेची दारू उडवण्याचे प्रमाण वाढले गेले त्या प्रमाणात सुरक्षितता पाळली जात नाही. यापूर्वी देखील शोभेच्या दारूच्या स्फोटामध्ये कित्येक जण मरण पावले आहेत. अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. काहींना जन्माची अद्दल घडली. याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. दोन्ही गावातील ग्रामस्थांत जागृती आणि त्यांची सुरक्षा प्रशासनाकडून वेळीच केली जाणे महत्त्वाचे आहे.
कवठे एकंद गावची परंपरा लक्षात घेता शोभेच्या दारूच्या होणाऱ्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आतषबाजी बंद होणे शक्य वाटत नाही. परंतु प्रशासनाकडून वेळीच सुरक्षिततेच्या सूचना ग्रामस्थांना देऊन नियमांचे काटेकोर पालन करवून घेतल्यास कवठेएकंद- नागाव गावची परंपरा पुढे चालू राहण्यास मदतच होईल. यामध्ये जाणारे हकनाक बळी, घडणाऱ्या दुर्घटना टाळता येणे शक्य आहे. प्रशासकीय अधिकारी जरी नव्याने पदभार सांभाळणारा असला तरी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून, आढावा घेऊन प्रशासनास योग्य दिशेने काम करावे लागेल. प्रशासनास सुचलेले उशिराचे शहाणपण सर्वसामान्य नागरिकांना महागात पडू नये अशी नागरिकातून चर्चा होत आहे.
