सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यात मे महिन्यापासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे द्राक्षासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. नेते अमोल काळे यांनी यासंबंधी तहसीलदार अतुल पाटोळे यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात त्यासानी सांगितले की सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांची छाटणी लांबणीवर पडली आहे. फळ छाटणी केवळ ५ टक्के क्षेत्रावरच झालेली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे द्राक्षपिकावर रोगराईचे प्रमाण वाढले असून गोळी घडावर जाण्याची दाट शक्यता आहे. अत्यंत खर्चिक असलेल्या द्राक्षशेतीत शेतकरी दुप्पट खर्च करूनही कर्जबाजारी होत आहेत. शासनाच्या सध्याच्या मदत निकषांमध्ये द्राक्षशेती बसत नसल्याने या पिकासाठी स्वतंत्र भरपाईचे निकष तयार करावेत, अशीही मागणी करण्यात आली.
मनसेच्या मागण्या पुढीलप्रमाणे तासगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी करावी, जिरायती पिकांसाठी एकरी ५० हजार, बागायती पिकांसाठी एकरी १ लाख व फळबागांसाठी एकरी १.५ लाख रुपये मदत द्यावी,जमीन खचून व वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी.
घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत.कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी बँकांकडून होत असलेल्या दबावाला आळा घालावा.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
