सांगली/तासगाव : महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महान संत सेना महाराज यांचे स्थान अद्वितीय असेच आहे. त्यांनी कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो हे आपल्या आचरणातून दाखवून दिले. समाजात समानता, प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. आजच्या काळात त्यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले.
संत सेना सेवा संघ व नाभिक समाज, तासगाव यांच्यावतीने संत सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्त पारायण सोहळा व भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. पंकज व सौ. प्रांजल गायकवाड या पती- पत्नीच्या तसेच सुमन जगन्नाथ गायकवाड यांच्याहस्ते श्रीं ची विधिवत पूजा झाली.
मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल संतोष भगवान गायकवाड ( भिलवडी ) यांचा तर सेवानिवृत्तीबद्दल प्रा.किशोर गायकवाड , शिक्षक विलास गायकवाड तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार सुनील गायकवाड व श्रीमती सुमन जगन्नाथ गायकवाड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार उमेश गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्रभाकर गायकवाड , प्रवीण जाधव , सुदाम खंडागळे , सोपान गायकवाड, बाळकृष्ण जाधव, विजय साळुंखे,अनिल गायकवाड यांचेसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे