सांगली /तासगाव : तासगांव तालुक्यातील महसूल अधिकाऱ्याकडील अर्धन्यायीक प्रकरणाचा जलद व कायमस्वरूपी निपटारा करण्याकामी तहसिल कार्यालय तासगांव येथे लोक अदालतीचे आयोजन केले आहे. अशी माहिती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी, उपविभाग मिरज यांचे न्यायालयामध्ये सुरु असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणाचा निपटारा करणेकामी शुक्रवार दि.29/08/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय तासगांव येथे लोक अदालतीचे आयोजन करणेत आले आहे. तसेच, तहसिलदार तासगांव यांचे न्यायालयामध्ये सुरु असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणाचा जलद व कायमस्वरूपी निपटारा करणेकामी बुधवार दि.03/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय तासगांव येथे लोक अदालतीचे आयोजन करणेत आले आहे.
तरी तासगांव तालुक्यातील नागरिकांना अवाहन करणेत येते कि, तासगांव तालुक्यातील दाखल अर्धन्यायिक प्रकरणातील वादी व प्रतिवादी यांनी तासगांव तालुक्यामध्ये आयोजित लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून दाखल अर्धन्यायिक प्रकरणात तडजोडीने आपसातील वाद मिटवून जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करणेसाठी सहकार्य करावे.
उपविभागीय अधिकारी मिरज यांचेकडील अपील प्रकरणे व तहसीलदार तासगांव यांचे कडील सुरु असलेल्या शेतरस्ता प्रकरणे, ७/१२ दुरुस्तीची प्रकरणे, वाटप दरखास्त प्रकरणे, फेरचौकशी प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपला आपसी तडजोडनामा सादर करावा.
ज्या शेतक-यांच्या शेतजमिनीशी संबंधित रस्ता, दुरुस्ती, अपिलांची प्रकरणे सुरु आहेत. त्यांनी ती समोपचाराने आपसात समझोता करून सोडवावीत व आपला वाद मिटवावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्ट अतुल काळे