रिपोर्ट - अतुल काळे
सांगली /तासगाव : तासगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार तासगाव अतुल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे कामकाज शिस्तबद्धरित्या नियोजित करण्यात आले असून 12 प्रभागाच्या एकूण 36 मतदान केंद्रावर 6 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त एकूण 36 पथके कार्यरत असून त्यामध्ये प्रामुख्याने केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी असे एकूण 200 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. यासोबतच अतिरिक्त सात राखीव पथकांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
महिला सशक्तिकरणाचे प्रतीक म्हणून श्रीमंत विनायकराव उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव या ठिकाणी पिंक बूथ चे नियोजन केलेले आहे. ज्या ठिकाणी संपूर्ण मतदान केंद्राची मतदान प्रक्रिया ही नियुक्त महिला मतदान अधिकारी कर्मचारी पार पाडणार आहेत.
ज्या केंद्रावर मुस्लिम बहुसंख्य महिला मतदार आहेत अशा 8 केंद्रांवर परदानसीन महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रत्येक केंद्रावर मतदारांच्या सोयीसाठी मतदार सहाय्यता कक्ष उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी मतदारास मतदार यादीतील अनुक्रमांक माहीत नसल्यास तो शोधण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तासगाव नगरपरिषद तासगाव यांच्या शिस्तबद्ध नियोजनाद्वारे तासगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी काटेकोरपणे कामकाज पार पाडत आहेत तर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले आहे.
