सांगली/तासगाव : मला इथले पैशाचे राजकारण संपवायचे आहे, विकासावर राजकारण करायचे आहे. मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो त्यामुळे तासगावकरांनी भाजपच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवावे. पालिकेवर आमची सत्ता आल्यास मी तासगावचा पालकमंत्री म्हणून काम करेन,अशी घोषणाच आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तासगाव पालिका निवडणुकीत 'भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे पॅनेल निवडून देण्याचे आवाहन केले.
बोलताना ते पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. 2047 मध्ये देशाला महासत्ता बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्ठीने ते काम करीत आहेत. इथले विरोधक पालिकेत सत्ता मागत आहेत,मात्र राज्यात आमची सत्ता आहे. राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे,त्यामुळे विरोधकांना सत्ता दिली तर तुम्हाला निधी कसा मिळणार. त्यामुळे तुम्ही सत्तेशी 'कनेक्ट' व्हावे.पालिकेवर आमची सत्ता आल्यास मी आठवड्यातील एक दिवस तासगावात येऊन बसेन. तुमच्या समस्या संपत नाहीत तोपर्यंत मी तासगावात येत राहीन. तासगावचा पालकमंत्री म्हणून मी काम करेन. तासगावच्या विकासाला निधी कमी पडणार नाही.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील म्हणाले, ४० वर्षानंतर तासगावात युवा पर्व सुरू होत आहे.आम्ही भाजपचे पॅनेल लावताना सर्व घटकांना न्याय दिला आहे.त्यामुळे आमचे पॅनेल विरोधकांना आस्मान दाखवेल. तासगाव पालिकेची सत्ता आलटून पालटून दोनच घरांकडे राहिली आहे. पण तासगावचा मुलभूत विकास झाला नाही. रिंग रोडसह अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तासगावात भाजपशिवाय निधी येऊच शकत नाही. त्यामुळे जनतेने परिवर्तन करायचे ठरवले आहे.विरोधकांनी निवडणुकीत पैशाचा अतिरेकी वापर सुरू केला आहे.उमेदवारी देताना लिलाव करुन, पैसे पाहून उमेदवाऱ्या दिल्या गेल्या आहेत.पण मतदारांनी पैसेवाल्या उमेदवारांना ओरबडून काढावे. त्यांना उघडं करावं. पुढच्या निवडणुकीत त्याचं उभा राहण्याचं धाडस नाही झाले पाहिजे. विरोधकांनी लादलेल्या उमेदवारांना घरी बसवा. मतदारांनी गुंडांपुढे झुकू नये. मतदारांनी सामान्य उमेदवारांना साथ द्यावी, यापुढे तासगावचा कारभार तासगावची जनताच करेल इथला निर्णय इथेच होईल.
यावेळी भाजपचे पदाधिकारी अनिल लोंढे, शेखर इनामदार, उदय भोसले, दिनकर धाबुगडे, सागर चव्हाण, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या चव्हाण यांच्यासह सर्व उमेदवार, भाजपचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
