रिपोर्ट अतुल काळे
सांगली/तासगाव : तासगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तासगाव नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 1 ते 12 साठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून तहसिलदार अतुल पाटोळे यांची तर सहायक निर्वाचन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तासगाव नगरपरिषदेची निवडणूक ही अध्यक्ष पद व 24 नगरसेवक यांच्यासाठी होणार असून मतदान साठी एकूण 36 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे. या सर्व मतदान केंद्राची पायाभूत सुविधा पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आली आहे. तासगाव शहरातील एकूण मतदार 32994 संख्या असून त्यापैकी महिला मतदार 16243 व पुरुष मतदार 16750 व इतर 1 एवढी संख्या आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार तासगाव यांच्याकडून निवडणुकीचा कामकाज पार पाडण्यासाठी आचारसंहिता पथक, एक खिडकी कक्ष, मदत कक्ष, स्थिर सर्व्हेक्षण पथक, व्हिडिओ सर्विलन्स पथक व भरारी पथक इत्यादींची नेमणूक करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी दिनांक 7/11/2025 रोजी राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडून देण्यात आले आहेत.
निवडणूकीचा प्रत्यक्ष कार्यक्रमाबद्दल तहसिलदार अतुल पाटोळे तासगाव यांचेकडून पुढीलप्रमाणे माहिती देण्यात आली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी दि.10 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 असा असून, सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. (रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन, तासगाव नगरपरिषद, तासगाव येथे आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून होईल. छाननीचे ठिकाण सर्कससिंह कै, परशुराम माळी सभागृह, तासगाव नगरपरिषद येथे आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा कालावधी अपील नसल्यास दि. 19 ते 21 नोव्हेंबर 2025 दुपारी 3.00 पर्यंत असून, अपील असल्यास दि. 21 ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येईल. मतदान दि. 02 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी दि. 03 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून होईल. मतमोजणीचे ठिकाण शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ, तासगाव येथे आहे. निवडणुकीचा निकाल दि. 10 डिसेंबर 2025 पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी व इच्छुकांनी नियमावलीनुसार वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.श
