ऐतिहासिक दसरा आतषबाजीसाठी कायद्याचे पालन करा : प्रशासनाचे आवाहन

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट अतुल काळे) 

सांगली/तासगाव: दसऱ्यानिमित्त होणारी ऐतिहासिक आतषबाजी सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले. प्रथा आणि परंपरांचे पालन करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दसऱ्याच्या शोभेच्या आतषबाजी उत्सवाच्या निमित्ताने कवठे एकंद येथील सिद्धराज मंदिर आणि नागाव येथील श्री नागनाथ मंदिर येथे प्रशासनाने ग्रामस्थांसोबत विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत ते बोलत होते.

    तहसीलदार अतुल पाटोळे म्हणाले, कवठे एकंद, नागाव येथील दसऱ्यानिमित्त होणारी फटाक्यांची आतषबाजी ही ऐतिहासिक परंपरेला नवीन पिढीसमोर ठेवताना चुकीच्या पद्धतीने जाऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी गावातील प्रतिष्ठित आणि जुन्या जाणत्या लोकांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड म्हणाले,  उत्सव शांततेत आणि आनंदाने योग्य ती दक्षता घेऊन साजरा करण्याचे आणि आतषबाजीसाठी रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी गावाचा यात्रा उत्सव शांततेने व सुखरूप पार पाडणे ही पोलिसांची व ग्रामस्थांची जबाबदारी आहे. परंतु, कायद्याच्या चौकटीत राहून आतषबाजी केली जावी. आतषबाजी करणाऱ्या शोभा दारू मंडळांनी यासाठी रीतसर परवानगी घ्यावी. धोकादायक दारूकाम टाळण्याचे आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. तरीसुद्धा, ग्रामस्थांनी व दारू शोभा मंडळांनी अजूनही जे धोकादायक दारुकाम आहे, ते कमी करावे. प्रत्येकाने आपापल्या जीवाची जबाबदारी घेतली आणि भावनांवर आवर घालून यात्रा पार पाडली, तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या.

प्रशासनाचे पाऊल -  दिनांक 30 सप्टेंबर पासून पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महसूल विभागाकडील मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांचे पथक तयार करण्यात आले असून ते शोभा दारू मंडळांना भेट देऊन मोठ्या प्रमाणात शिंगाडे व इतर फटाक्यांची निर्मिती होणार नाही याची दक्षता घेतील तसेच ज्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत त्यांचे विरुद्ध उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    या बैठकांना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, दोन्ही गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा समिती सदस्य आणि शोभा दारू मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!