सांगली/तासगाव : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा. उद्दिष्टे ठरवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील रहावे. सुसंस्कृत समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, ए.आय.च्या जमान्यातही शिक्षकांचं स्थान ठिकून आहे.मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण आपल्या हातात आले असले तरी गुरुजींचे महत्त्व अबाधित आहे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील भावनिक आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात.शिक्षक दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रशासन चालविण्याचा अनुभव घेतला. वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयाचे अध्यापन केले.शिक्षक दिनाचे प्राचार्य म्हणून कु.अनुष्का पाटील,उपप्राचार्य म्हणून प्रणव नलवडे,इन्चार्ज म्हणून सुप्रिया घुटुकडे यांनी काम पाहिले.कु.पायल सुतार, गौरी कोरे ,विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांची भूमिका पार पडताना आलेले विविध अनुभव कथन केले. यावेळी प्रा.डी.व्ही.पाटील,प्रा.शंतनू राऊळकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार कु.प्रज्ञा सुतार हिने केले. प्रा. अरुणा सुतार यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे