सांगली/तासगाव : तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाणा मार्केटच्या बांधकामामध्ये तब्बल ३ कोटी १८ लाख ६५ हजार २०५ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. लेखापरीक्षण अहवालात हा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या प्रकरणी दोषींवर तासगाव बाजार समितीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी तासगाव बाजार समितीला निवेदन दिले असून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे, लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, बेदाणा मार्केटच्या बांधकामाचे कंत्राट कुबेरा कन्स्ट्रक्शन, सांगली (प्रो.प्रा. मोतीलाल पारिख) यांना देण्यात आले होते. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमोद चौगुले-पाटील यांची सल्लागार अभियंता म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
प्रत्यक्षात हे बांधकाम ९ कोटी ८५ लाख ७५ हजार ०९५ रुपयांचे झाले असताना, कंत्राटदार आणि सल्लागार यांनी संगनमताने ते १३ कोटी ४ लाख ४० हजार ३०० रुपयांचे झाल्याचे भासवले. खोटी बिले तयार करून आणि त्यांना प्रमाणित करून त्यांनी बाजार समितीची फसवणूक केली. यामुळे बाजार समितीचे ३,१८,६५,२०५ रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार
या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी बाजार समितीने तासगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे बाजार समितीला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला.
मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा
तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, सांगली यांनी बाजार समितीला न्यायालयामध्ये 'प्रायव्हेट कम्प्लेंट' (खाजगी तक्रार) दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अद्याप ही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
या दिरंगाईमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जर लवकरच दोषींवर न्यायालयात तक्रार दाखल झाली नाही, तर मनसे 'खळखट्याक' आंदोलन करेल, असा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे.
रिपोर्ट अतुल काळे
