नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 1, नेरुळ, नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार डॉ.संजीव नाईक, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर श्री.जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नेरुळ से.1 येथे राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रचलीत असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने होत होती. त्यास अनुसरुन या चौकामध्ये असलेल्या घुमटाकार मेघडंबरीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनासह 12 फूट उंच व 2.5 टन वजनाचा असलेल्या या प्रेरणादायी पुतळ्याच्या भोवती ऐतिहासिक वातावरण निर्मितीसाठी सभोवतालच्या क्षेत्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी 4 भाला धरलेले मावळे आणि तोफांसहित 3 मावळे यांच्या शिल्पाकृती उभारण्यात आल्या आहेत. शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठानचे प्रमुख शिल्पकार प्रा. मोरेश्वर पवार यांनी पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुतळा स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय परवानग्या प्राप्त आहेत.
