(रिपोर्ट अतुल काळे )
सांगली /तासगाव : शेतकऱ्याची प्रतारणा करणाऱ्याला नरकात जागा नाही असा हल्लाबोल करत सांगली जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाचे नेते संजयकाका पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मंगळवारी (दि.14) एसटी स्टँड चौक तासगाव येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊस यामुळे आसमानी संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे तर बँकांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्या मागे लावलेला तगादा हे सुलतानी संकट आहे. शेतकरी उध्वस्त झाला असताना त्याला सरकारकडून सरसकट कर्जमाफी मिळणे हाच आमचा उद्देश आहे. पब्लिसिटी करणे हा आमचा उद्देश नाही नौटंकी करण आमच्या रक्तात नाही. असा टोला त्यांनी विरोधकांना यावेळी नाव न घेता लावला. शेतकरी दयनीय अवस्थेत आहे. शेतकऱ्यांची प्रतारणा करणाऱ्याला नरकात जागा मिळणार नाही. सत्तेत असताना मोठ्या प्रमाणावर निधी आणला. थांबलेल्या, रखडलेल्या योजना पुढे नेल्या. आता शेतकरी हाच माझा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तासगाव तालुका बंड करणाऱ्यांचा तालुका आहे. इंग्रजांचा जॅक उतरविण्यासाठी तासगाव तालुका अग्रेसर होता. तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजे. आंदोलनाची ठिणगी तासगाव मधूनच निर्माण व्हायला हवी. तासगाव हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. शेतकरी एकत्र आला तरच तरच मदत मिळेल. असा एल्गार त्यांनी यावेळी पुकारला.
यावेळी युवा नेते प्रभाकर पाटील, हर्षवर्धन जाधव आणि इतर वक्त्यानी शेतकऱ्याची तळमळ व्यक्त केली. संजयकाका तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बैलगाडी, ट्रॅक्टर, जेसीबी, शेळी मेंढी, जनावरे घेऊन तासगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. स्टॅन्ड चौक येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे तासगाव- सांगली, तासगाव - विटा, तासगाव- आष्टा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
संजयकाका पाटील पुढे म्हणाले, जातीय वाद करून लक्ष भरकटवलं जातय. जाती-धर्मात जे कोण विष पेरते ते चांगले नाही. आधी शेजारधर्म पाळत होते. आमदार खासदारकी मिळवण्यासाठी खालची पातळी गाठू नका. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीचे विष पेरू नका. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू....... असे म्हणत तासगाव कवठेमहांकाळ सह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित व भरीव आर्थिक मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करून बँकांची सोसायटीची कर्ज वसुली थांबवा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत द्या अशा विविध मागणीचे निवेदन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले.
