(रिपोर्ट -अतुल काळे)
सांगली/ तासगांव : यंदाच्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे झालेल्या अभूतपूर्व पीक नुकसानीबाबत तातडीने न्याय मिळावा यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि त्वरित भरीव आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी एसटी स्टँड चौक तासगाव येथे सकाळी 9 वाजता भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तरी या आंदोलनात दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तासगाव कवठेमहंकाळचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले
यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये द्राक्ष, ऊस, सोयाबीन, उडीद, भुईमुग, मका, हुलगा, भाजीपाला आणि इतर फळपिके यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या गंभीर परिस्थितीत, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संथ असल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पंचनामे संदर्भात प्रांताधिकारी उत्तम दिघे तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तासगाव तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे कवठेमंकाळची कृषी अधिकारी यांच्यासह दोन्ही तालुक्यातील मंडल अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे. तासगाव-कवठेमहांकाळसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करावी. अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित व भरीव आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करावी. सांगली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून बँकांची व सोसायटीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात.
या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला
"ऐका सरकार बळीराजाचा एल्गार, कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार..!" असा घोषणा देत समस्त शेतकरी बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तासगाव तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी आपापल्या गावातील ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन चक्काजाम आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.