प्रतिनिधी अतुल काळे
सांगली/तासगाव : तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातील राजकारण 2 व्यक्ती भोवती फिरत राहिले. त्यामुळे मतदार संघाचा विकास झाला का? हे सामान्य जनताच जाणते. राजकारण हे व्यक्ति भोवती न फिरता ते पक्षाच्या, विचाराच्या, चिन्हाच्या आणि सामान्य जनतेच्या हिताभोवती फिरलं पाहिजे. तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघात आता भाजपा रुजवायचा आहे. असं मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तासगाव येथे व्यक्त केले. तासगाव तालुका भाजपा नूतन कार्यालय उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपकबाबा शिंदे, पृथ्वीराजबाबा देशमुख, संग्राम देशमुख, मकरंद देशपांडे, वैभव पाटील, दिनकर धाबुगडे, सागर धाबुगडे, आदि भाजपा नेते उपस्थित होते. भाजपा तासगाव तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्निल भैय्या पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, गेल्या अनेक वर्षात बीजेपीला तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात भरभरून यश मिळाले नाही. या मतदारसंघात 2 व्यक्ती भोवतीच राजकारण फिरत राहिले. त्यामुळे मतदार संघाचा विकास किती झाला हे जनतेलाच माहीत असा खोचक टोला त्यांनी मतदार संघातील राजकीय नेत्यांना लगावला. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तर देशात मुलायम सिंग यादव, केजरीवाल अशा व्यक्तींचे पक्ष असल्याची उदाहरणे दिली. परंतु भाजपा हा कोणा एका व्यक्तीचा पक्ष नाही. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. अटल बिहारी वाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज आदि नेत्यांची आठवण करून देत सर्वसामान्या जनतेचा पक्ष म्हणजे भाजपा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा देशहिताचा विचार करणारा पक्ष आहे. तासगाव कवठेमहांकाळ मध्ये भाजपा रुजवायचा आहे. असे ते म्हणाले.
भारत देशाला वैभवाप्रत नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं. 370 कलम हटवलं, अयोध्येतील राम मंदिरची उभारणी, काशी विश्वेश्वर मंदिर ही मानबिंदूची कामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासकामे राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचली आहे. ॲड. स्वप्निल पाटील जोशपूर्ण व्यक्ती आहेत.तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपा रुजवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले, मतदार संघात गेल्या 50 वर्षात सेटलमेंटचे राजकारण होत गेलं. इतर कोणताच पक्ष पुढे आला नाही. येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार तयार आहेत. या निवडणुकीत धक्कादायक निकाल नोंदवला जाईल. तासगाव कवठेमहांकाळ मध्ये फक्त लढ म्हणा, आम्ही तयार आहोत. असा विश्वास भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी होणाऱ्या सत्काराच्या औपचारिकतेला चंद्रकांतदादा पाटील यांनी फाटा देत थेट भाषणाला सुरुवात केली तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड चे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
